मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या एकापाठोपाठ एक छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त व्यक्तव्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान करुन प्रसाद लाड यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांच्या या विधानावर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या काही व्यक्तींनी केला. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असंही म्हटलं नाही. एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत असताना आता प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची अडचण वाढणार आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असं विधान त्यांनी केलं. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल... पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं ते प्रसाद लाड म्हणाले.
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असं त्यांनी म्हटलं. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचं बालपण रायगडावर गेले, असं प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असंही लाड म्हणाले.
 
                                    
                                
                                
                              
