सध्या वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र फटका बसत आहे. बदलत्या वातावरणाचा (Climate change) आंबा पिकावर मोटा परिणाम होत आहे. त्यामुळं कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी (Mango farmers) चिंतेत आहेत. कोकणात पडणारा अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये (sindhudurg) आंबा पिकावर तुडतुड्यासारख्या किड रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.
हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळं फळांचा राजा हापूस आंब्याला फटका बसला आहे. कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळं फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार
दरवर्षी वाशी बाजार समितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परतीच्या पावसामुळं झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळं आंब्याची पहिली पेटी जरी वाशी बाजार समितीमध्ये दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे.
परतीच्या पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका
यंदा राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानं तर धुमाकूळ घातला होता. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसानं वाया गेली होती. कापूस, सोयाबीन, फळपिके या पिकांना मोठा फटका बसला होता. तर या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. दुसरीकडे या पावसाचा आंबा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. यामुळं यंदा आंब्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.