Advertisement

ओबीसी जागेवर कुणबी उमेदवार देण्यास  राजकीय पक्षांची सावध भूमिका

प्रजापत्र | Sunday, 09/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. ८ (प्रतिनिधी ) : मराठा आरक्षण आंदोलनानंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक राजकीय परिस्थिती मोठ्याप्रमाणावर गाडूळ झालेली असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना देखील प्रमुख राजकीय पक्षांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा घास घेत असल्याची ओरड होत असल्याने आता ओबीसींसाठी राखीव जागेवर कुणबी प्रमाणपत्र असणारांना उमेदवारी द्यायची का याबाबत प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मोठा संभ्रम असल्याचे चित्र असून अशा अनेक इच्छुकांना पक्षांकडून 'थांबा आणि वाट पहा ' चा संदेश देण्यात येत आहे.
     मागच्या दोन वर्षात बीड जिल्ह्यातील एकूणच राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा आणो ओबीसी समाज थेट एकमेकांच्या समोरासमोर आल्याचे आणि त्यावरून मग निवडणुकांमध्ये राजकीय ध्रुवीकरण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. यामुळे अनेक ठिकाणची राजकीय गणिते देखील मोठ्याप्रमाणावर बदलली आहेत. त्यातच आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसींच्या राजकीय आरक्षणात यायचे आहे असे आरोप मागच्या काळात सर्रास झाले. त्याला ओबीसीच्या नेत्यांनी जाहीर विरोध देखील केला. ओबीसी राखीव जागेवर कुणबी प्रमाणपत्र असणारांना उमेदवारी देऊ नये असे आवाहन ओबीसी नेत्यांनी सर्वच राजकीय पक्षांना केले असून प्रसंगी शक्ती दाखविण्याचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीत ओबीसी जागेवरून उमेदवारी जिसचित करताना प्रमुख राजकीय पक्षांची गोची झाल्याचे चित्र आहे.
मुळात नगरपालिका निवडणुकीत एखादा अपवाद वगळता बहुतांश शहरांची सामाजिक परिस्थिती ओबीसी बहुल किंवा मराठेतर बहुल अशीच झालेली आहे. त्यामुळे किमान शहरात ओबीसी मतदाराला दुखावण्याची तयारी कोणताच राजकीय पक्ष दाखवण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे आता ओबीसी राखीव जागांवरून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कुणबी मराठा उमेदवाराला थेट उमेदवारी देताना भाजप, दोन्ही राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष कचरत असल्याचे चित्र सध्यातरी आहे.
भाजपने तर खाजगीत अनेक इच्छुकांना ओबीसी जागेवर कुणबी मराठा उमेदवार दिला जाणार नाही, तुम्ही खुल्या जागेत लढण्याची तयारी करा असा स्पष्ट संदेश दिला असल्याचे सांगितले जाते, मात्र यावर कोणी अधिकृत भाष्य केलेले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची देखील अनेक ठिकाणी तीच परिस्थिती आहे. मूळ ओबीसी आणि कुणबी मराठा ओबीसी हा वाद बीड जिल्ह्यात जास्त असला तरी प्रमुख  राजकीय पक्षांना राज्यभरात निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्यासाठी राज्यभरात वेगळा संदेश देण्याची इच्छा कोणत्याच राजकीय पक्षाची नाही . त्यामुळे ओबीसी जागेवर लढू इच्छिणाऱ्या कुणबी उमेदवारांना सध्यातरी 'थांबा आणि वाट पाहा ' असेच निरोप मिळत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement