Advertisement

मुंबई, ठाण्यापाठोपाठ भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा शिरकाव

प्रजापत्र | Tuesday, 22/11/2022
बातमी शेअर करा

मुंबईत गोवर आजाराचा  उद्रेक झाल्यानंतर ठाणे आणि भिवंडीतही बालकांना मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच नाशिक जिल्ह्यातील मालेगावात रुग्णसंख्या आढळल्यानंतर आता नाशिकमध्येही गोवरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. ज्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत  यांनी गोवर उद्रेकासंबंधी आढावा घेतला. सोबतच कस्तुरबा रुग्णालयात जाऊन त्यांनी बालकांवर सुरु असलेल्या उपचारासंबंधी माहिती देखील घेतली. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झालं असून उपाययोजना सुरु करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. 

 

 

गोवर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात लसीकरण हा एकच उपाय आहे. मात्र 0-9 महिने मुलांमध्ये गोवरची लागण होण्याचं प्रमाण 8-9 टक्के आहे. त्यामुळे या मुलांना देखील लस देत सुरक्षित करावं असं मत अनेक डॉक्टर तसंच तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यासंबंधी मुंबई पालिकेकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे.

 

 

गोवरचा उद्रेक थांबवायचा असेल तर यासाठी एकच मोठे हत्यार आहे ते म्हणजे लसीकरण आणि त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व्हेक्षण करत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात लसीकरणाचे अतिरिक्त सत्र घेत गोवरचा उद्रेक कमी करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. मात्र, त्याला गरज आहे ती लसीकरणाला साथ देत त्याचा वेग कायम ठेवण्याची. 


 

Advertisement

Advertisement