नवी दिल्ली: देशाच्या अंतराळ विकास कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून पहिलं खासगी रॉकेट विक्रम एस (Vikram-S) चे आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं आहे. 'मिशन प्रारंभ' (Mission Prarambh) अंतर्गत विक्रम एस या हायपरसोनिक रॉकेटचं सकाळी 11.30 वाजता उड्डाण करण्यात आलं. श्रीहरीकोटातील स्पेस स्टेशनवरून इस्त्रोच्या (ISRO) मदतीने हे उड्डाण करण्यात आलं असून त्यामुळे देशात खासगी रॉकेट विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इलॉन मस्कच्या स्पेसएक्सप्रमाणे भारतातही खासगी कंपन्यांकडून अंतराळ क्षेत्रात कामगिरी केली जाणार आहे.
हैदराबादच्या स्कायरुट एरोस्पेस (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीकडून विक्रम एस या रॉकेटचं लॉन्चिंग करण्यात आलं असून त्याचा वेग आवाजाच्या पाच पटीने जास्त आहे. या लॉन्चिंगसाठी भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था म्हणजे इस्त्रोची मदत झाली आहे. या मिशनला प्रारंभ (Mission Prarambh) असं नाव देण्यात आलं आहे. या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.
स्पेस किड्झ इंडिया, बॅझूमक्यू आर्मनिया आणि एन स्पेस टेक इंडिया या तीन पेलोड्सचे वहन विक्रम एस या रॉकेटमधून करण्यात आलं आहे. विक्रम एसमध्ये रॉकेटची स्पिनिंग स्थिरता कायम रहावी यासाठी सॉलिड थ्रस्टर्स 3D-प्रिंटचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटच्या माध्यमातून भविष्यातील विक्रम सीरिजच्या ऑर्बिटल-क्लास अंतराळ प्रक्षेपण वाहनांसाठी 80 टक्के तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येणार आहे.
विक्रम-एस चे वजन 545 किलोग्रॅम असून त्याची लांबी सहा मीटर तर व्यास 0.375 मीटर आहे. यामध्ये सात टनांचा पीक व्हॅक्यूम थ्रस्टचा वापर करण्यात आला आहे. विक्रम एस हे 83 किलोग्रॅम वजनाचे पेलोड कमाल 100 किलोमीटर उंचीवर वाहून नेऊ शकते.