चर्चेतले : संजय मालाणी
बीड : 'ते कधी राजकीय कुरघोड्यांना जुमानत नाहीत, राजकीय आघातांनी व्यथित होत नाहीत, वय त्यांच्यासाठी अडसर ठरत नाही, निसर्गाला देखील आव्हान देण्याची त्यांची कायम तयारी असतेच, मात्र अगदी कार्यकर्त्यांना भेटण्यापासून दुर्धर आजार देखील त्यांना थांबवू शकत नाही ' अशी उदाहरणे राजकारणात अभावानेच आढळतात, असे मापदंड निर्माण करण्यासाठी लागते तो टोकाची जिद्द आणि इच्छाशक्ती , त्या जिद्द आणि इच्छाशक्तीचे दुसरे नाव म्हणजे शरद पवार. आजारी असतानाही शिर्डीच्या अधिवेशनाला उपस्थिती लावून शरदरावांनी दाखवून दिले आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहून पवारांनी केवळ स्वतःमधली जिद्द दाखविलेली नाही, तर 'पुरोगामी विचारांची कास सोडू नका, पक्ष बांधणी बळकट करा' असा भविष्याचा वेध घेणारा मार्ग देखील कार्यकर्त्यांना दाखविला आहे.
ज्या ज्या गोष्टी इतरांना अशक्यप्राय वाटतात, त्या करून दाखविण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन झाले. मात्र अधिवेशनाच्या काही दिवस अगोदरच शरद पवारांना रुग्णालयात दाखल करावे लागले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारासोबत पवारांनी केलेला संघर्ष साऱ्या महाराष्ट्राला माहित आहेच, मात्र त्यामुळेच त्यांच्या तब्येतीची काळजीही तितकीच घ्यावी लागते. म्हणूनच शरद पवारांना ज्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी सुट्टी द्यायला नकार दिला, त्यावेळी राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला शरद पवारांची उपस्थिती अशक्य कोटीतलीच वाटत होती, मात्र धक्कातंत्रात प्रवीण असलेल्या शरद पवारांनी यावेळीही धक्का दिलाच. 'पक्षाचे अधिवेशन होत असताना कार्यकर्त्यांना भेटल्याशिवाय मी राहूच शकत नाही ' असे म्हणत वयाची ८० वर्ष ओलांडलेले पवार आजारी असतानाही शिर्डीत आले आणि त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना छोटेच पण महत्वाचे मार्गदर्शन करीत 'पुरोगामी विचारांची कास सोडू नका' असा विचार देखील दिला. वय, आजारपण असे अडसर असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर काहीही करता येते हे पुन्हा एकदा पवारांनी दाखवून दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर प्रदीर्घ आणि मुरब्बी राजकारणासाठी ज्यांचे नाव घेतले जाते त्यात शरद पवार आहेत. त्यांचे राजकीय डावपेच किंवा त्यांच्या भूमिका समजायला अनेकदा वेळ लागतो, त्याबद्दल सुरुवातीला गैरसमज देखील होतात, मात्र कालांतराने शरद पवार यांच्या भूमिकेचे परिणाम दिसतात , हे यापूर्वी देखील अनेकदा अनुभवायला आलेले आहे.ज्यावेळी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवारांनी भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा दिला होता, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र पाच वर्षानंतरच्या महाविकास आघाडीचे बीजारोपण त्याचवेळी झाले होते, हे आता कळत आहे. राजकारणात सदासर्वकाळ संघर्ष करायचा नाही, मात्र कसोटीच्या क्षणी ठाम भूमिका घ्यायची हा पवारांच्या राजकारणाचा पायंडा आहे आणि ज्याज्यावेळी पुरोगामी विचारधारेची भूमिका घेण्याची वेळ आली, त्या त्या वेळी शरद पवारांनी ती जिद्दीने, ठामपणे आणि अनेकदा परिणामांची पर्वा न करता घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील जिद्द महाराष्ट्राला अनुभवायला मिळाली आहे. महिला सक्षमीकरण असेल, नामांतराचा मुद्दा असेल, ओबीसी आरक्षण अशा अनेक विषयांवर भूमिका घेताना त्यांनी आपली वैचारिकता , पुरोगामी विचार प्रत्यक्षात आणले, भले वेळ पडली तर त्यासाठी किंमत मोजून तात्पुरता राजकीय फटका सहन करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक प्रगतीतही त्यांचे योगदान मोलाचे आहे