Advertisement

हेतू चांगला असला तरी टाळायला हवा मोह

प्रजापत्र | Tuesday, 20/09/2022
बातमी शेअर करा

बीड दि. १९ (प्रतिनिधी ) : माजलगाव धरणात बुडालेल्या डॉक्टरचा शोध घेताना एनडीआरएफचा जवान देखील बेपत्ता झाला आणि त्यानंतर जवानांचे मनोधेर्य वाढवायला म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतःच बोटीच्या माध्यमातून जलाशयात उतरले. हे करण्यामागचा शर्मा यांचा हेतू निश्चितपणे चांगला असेल, प्रशासन आपल्या पाठीशी आहे, असे दाखविण्याचा असेल, यात शंका घेण्याचे काही कारण नाही, मात्र जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीनेकसोटीच्या क्षणी असे साहस दाखविणे अपेक्षितही नाही आणि योग्य देखील नाही. जिल्हाधिकारीच पाण्यात उतरल्याने मग सारी यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षेभोवती केंद्रित होते आणि मूळ काम बाजूला राहते असा अनुभव आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांचा हेतू चांगला असला तरी त्यांनी असले 'मोह ' टाळायला हवेत .

ज्यावेळी एखादी नैर्सगिक आपत्ती येते , किंवा महापुरात, जलाशयात कोणी अडकते, त्यावेळी तेथील व्यक्तींची सुटका करण्याची एक कार्यपद्धती असते. त्याचे प्रशिक्षण एनडीआरएफच्या जवानांना दिलेले असते. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी एनडीआरएफला पाचारण केले जाते, त्यावेळी त्यांना त्यांच्या पद्धतीने काम केले जाऊ द्यायला हवे. अशावेळी प्रशासनाने त्यांच्या मदतीसाठी काय पूरक भूमिका घेता येईल ती घेणे अपेक्षित आहे. मात्र माजलगाव जलाशयात डॉक्टर आणि बेपत्ता जावं यांना शोधण्याचे दुहेरी आव्हान निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा स्वतःच एका बोटीत स्वार होतात आणि जलाशयात उतरतात हे चित्र पाहायला मिळाले. एक व्यक्ती म्हणून राधाबिनोद शर्मा हे पोहण्यात तरबेज असतीलही कदाचित , ते थेट बोटीत चढून जलाशयात उतरले म्हणुजे त्यांना बचाव कायचे प्रशिक्षण देखील झाले असेल असे गृहीत धरायला हरकत नाही, त्यांचा यामागचा हेतू प्रसिद्धी पेक्षाही त्या जवानांचे मनोधेर्य वाढविणे असा होता याबाबतही संशय घेण्याचे कारण नाही, पण व्यक्तीच्या पलीकडे जाऊन ते एक जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीने यंत्रणा राबवून घ्यायची असते, त्यासाठी आपल्या पदाचा वापर करायचा असतो. स्वतः बचाव यंत्रणेचा भाग व्हायचे नसते . कोणत्याही व्यवस्थेत प्रत्यक्ष काम करणारे आणि निर्णय घेणारे हे दोन भाग असतात, एकाने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करणे चुकीचेच आहे. इतक्या स्पष्टपणे हे मांडलेले कदाचित त्यांना आवडणार देखील नाही, मात्र जिल्हाधिकारीच बोटीत बसले, त्याही बोटीत जिल्हाधिकाऱ्यांसह पाच जण बसले, म्हणजे साऱ्याच व्यवस्थेचे प्रेशर वाढणारच, ही काही पाहणी करण्याची वेळ नव्हती , त्यामुळे त्या बेपत्ता लोकांचा शोध घ्याचा का जिल्हाधिकाऱ्यांना 'सांभाळायचे यात नाही म्हणले तरी यंत्रणेचा गोंधळ उडतोच . आणि जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीने तरी असे मोह टाळायला हवेत . त्यांचे काम यंत्रणा हलविणे आहे, यंत्रेचे स्ट्रिंग स्वतःच्या हातात घेणे नाही. जिल्हाधिकाऱयांचा उत्साह, संवेदनशीलता सारेच लक्षात घेतले आणि त्याचा आदर केला तरी 'ज्याचे काम त्याला करू देण्याची ' अपेक्षा ' वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांकडून नाही तर मग कोणाकडून करायची ?

Advertisement

Advertisement