पंजाब हे देशातले एक प्रगतिशील राज्य, हरितक्रांतीच्या स्वप्नाला सर्वात अगोदर प्रतिसाद दिला तो याच राज्याने, देशाच्या संरक्षणासाठी सर्वाधिक जवान देणारे हे राज्य , मात्र मागच्या काळात 'उडता पंजाब' चे कटू वास्तव समोर आले होते, त्यावेळी देशभर पंजाबची वेगळीच चर्चा झाली, आता तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विदेशात उडत्या विमानातून खाली उरविण्यात आले, त्यामागचे कारण भगवंत मान यांना स्वतःचा तोल देखील सांभाळता येत नव्हता हे आहे. देशाची मन शरमेने खाली जावी असेच हे चित्र आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले. ते दारूच्या नशेत होते, त्यामुळे विमान कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते. मुख्यमंत्री भगवंत मान हे जर्मनीला गेले होते, त्याठिकाणी झालेल्या या प्रकरणाची आता देशात खळबळ मोजणे साहजिक आहे. विमान कंपनीने त्यांना ते दारूच्या नशेत असल्याने खाली उतरविल्याचे सांगितले जात आहे, तर आम आदमी पक्ष मात्र मान यांच्या शरीरात वेदनाशामक औषधांची जास्त मात्रा आढळल्याचे सांगत आहे. जर खरेच आम आदमी पक्ष सांगतोय तेच कारण असेल तर पंजाब सरकार किंवा स्वतः भगवंत मान यांनी आतापर्यंत त्या विमान कंपनीवर दावा ठोकायला हवा होता, मात्र अजूनतरी असे काही झालेले नाही , यातूनच खूप काही स्पष्ट होते.
यापूर्वीच्या काळात जगभरात भारतातील पंजाब या राज्याची प्रतिमा खूप चांगली आहे. एक उद्यमशील, मेहनती राज्य म्हणून जगात पंजाबला आणि पंजाबी लोकांना ओळखले जाते. देशाच्या एकंदरीत विकासात देखील पंजाबचे योगदान मोठे आहे. देशाच्या संरक्षणासाठी सर्वाधिक जवान प्युरविणारे हे राज्य आहे. या राज्यातील अनेक लोक विदेशात आहेत, त्यांच्या माध्यमातून देशाला बऱ्यापैकी परकीय चलन देखील मिळते , हे आपल्यासर्वांच्या दृष्टीने पंजाबचे महत्व आहे. मात्र याच पंजाबची अवस्था मागच्या एक दोन दशकात बिघडत चालली आहे. एकेकाळी हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणारा पंजाब मागच्या काही काळात 'गर्दुल्ला ' पंजाब झाला . अभिषेक चौबे यांच्या सहा वर्षांपूर्वी आलेल्या 'उडता पंजाब ' या चित्रपटाने या परिस्थितीवर भाष्य केले होते , तेव्हाच खरेतर पंजाबच्या या परिस्थितीचे आत्मपरीक्षण व्हायला हवे होते. मात्र ते झाले नाही. आणि पंजाबचे चित्र अधिकच बिकट होत आहे.
आम आदमी पक्षाने जेव्हा भगवंत मान यांना मुख्यमंत्री केले होते, तेव्हाही मान यांचा 'पूर्वेतिहास ' चर्चेला आला होताच. त्यावेळी काँग्रेससह भाजपनेही 'बेवडी सरकार ' म्हणून मान यांच्या सरकारची संभावना केली होती . त्या संभावनेमागचे राजकारण काही काळ सोडून देताही येईल , मात्र मान यांचे नशेत असणे अनेकांनी अनुभवले होते . एखाद्या व्यक्तीने व्यक्तिगत आयुष्यात कसे वागावे याचे स्वातंत्र्य त्याला नक्कीच आहे, मात्र सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी , त्यातही त्या व्यक्तीकडे जेव्हा एका राज्याचा प्रतिनिधी म्हणून पहिले जात असते , त्यावेळी त्या व्यक्तीने काही सामाजिक संकेतांचे भान ठेवणे आवश्यक असते. ते मान यांना कधीच जमले नव्हते. प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्टीत 'राजकारण ' असल्याची ओरड करणे हा आम आदमी पक्षाचा अजेंडा आहेच, आता देखील ते तसेच ओरडतील , पण कधीतरी आपले नाणे कसे आहे याचा विचार केजरीवाल करणार आहेत का ? करणे काहीही असोत , भगवंत मान प्रकरणाने पुन्हा एकदा 'उडता पंजाब'ची आठवण झाली असून देशाची मान मात्र खाली गेली आहे .