परळी दि.२१ (प्रतिनिधी)-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परळी तालुक्यात खिंडार पडले आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी परळी तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव शिंदे, शिवसेनेचे तालुका सचिव रामराव माने, सिरसाळा शहर प्रमुख कैलास कावरे, युवासेनेचे विधानसभा प्रमुख बाबा सोनवणे, पिंपरी बुद्रुकचे सर्कल प्रमुख विश्वनाथ राठोड, सिरसाळा येथील सर्कल प्रमुख दत्ता महाराज सोनवणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेतील शिंदे गटाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आम्हाला मान्य असून जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यात काम करणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे परळीत शिवसेनेला खिंडार पडले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक अशोक गाढवे, अंबाजोगाई तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, केजचे शिवसेनेचे नेते पंजाब देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.