स्टँड अप कॉमेडीयन मुनव्वर फारूखीचा शनिवारी हैदराबाद येथील शिल्पकला हायटेक सिटी येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी भाजपाच्या एका नेत्यानं दिली आहे, त्यामुळे कार्यक्रमस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात हजर राहून निषेध व्यक्त करण्यासाठी काही भाजपा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे तिकीटही विकत घेतल्याचं समजत आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांनी सोबत मोबाइल फोन अथवा पाकीट आणू नये, अशा सूचना माधपूर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
तेलंगणा राज्याचे भाजपा प्रमुख बंदी संजय कुमार यांनी मुनव्वर फारुखीचा शो बायकॉट करण्याचं आवाहन केलं आहे. “मुनव्वर फारुखीने हिंदू देवी-देवतांचा अवमान केला आहे. सीता ही आपली आराध्य दैवत आहे. पाणी, हवा, अग्नी आणि जमीन अशा सर्व ठिकाणी सीतेचं अस्तित्व आहे. पण टीआरएसच्या काही कार्यकर्त्यांनी राम आणि सीतेचा अवमान करणाऱ्या फारुखीला प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाचा निषेध करायला हवा” असं आवाहन बंदी संजय कुमार यांनी केलं आहे.
त्याचबरोबर भाजपा आमदार राजा सिंह यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजा सिंह यांनी कार्यक्रम उधळून लावण्याची आणि मुनव्वर फारूखीला मारहाण करण्याची धमकी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कार्यक्रमस्थळी बंदोबस्त वाढवला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी उशिरा भाजपाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची ऑनलाइन तिकीट खरेदी केले आहेत. कार्यक्रमस्थळी वाद निर्माण करण्याचे त्यांचे मनसुबे असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे माधपूर पोलिसांनी कार्यक्रमस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुनव्वर फारुखीनं संबंधित कार्यक्रमासाठी पूर्व परवानगी काढली असल्याची माहिती माधपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र प्रसाद यांनी दिली आहे.