Advertisement

नरेंद्र मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्त्व

प्रजापत्र | Friday, 19/08/2022
बातमी शेअर करा

पुणे - भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपने केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान दिल्याने फडणवीस यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पक्षादेश मानून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपने मला सर्वोच्च पदावर बसवलं होतं, त्यामुळे पक्षादेश माझ्यासाठी सर्वस्व असल्याचं सांगत फडणवीस यांनी अनपेक्षितपणे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अखेर या निष्ठेचं फळ त्यांना भाजपने दिलं. त्यानंतर, फडणवीस हे केंद्रीय राजकारणात सक्रीय होतील, अशा चर्चा आता रंगत आहेत. त्यातच, पुण्यातील ब्राह्मण महासंघाने फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमदेवारी देण्याची मागणी केली आहे. 

 

 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका भाषणात बोलताना फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील. पण, ते केंद्रात गेले तर चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर, काही दिवसांतच देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे, भाजपच्या गोटात फडणवीसांच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या चर्चा रंगल्या आहेत. आता, नागपूरऐवजी पुण्यातून फडणवीसांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. 

 

 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bhartiya Brahmin Mahasangh) आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग केल्याचं दिसून येत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ही मागणी भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, आता फडणवीस यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान लवकरच निश्चित होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

 

 

पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ साली काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ साली अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्या पाठिशी उभा राहिला. याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळेच, सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले नेतृत्व आहे. गेल्या ५ वर्षांत त्यांनी आपली परिपक्वता सिद्ध करुन दाखवली आहे. ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. पण, राष्ट्रहिताला प्राधान्य देते, म्हणूनच फडणवीस हे नरेंद्र मोदींनंतर भाजपच्या वैभवशाली नेतृत्त्वाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वासही महासंघाने नड्डांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. 
 

Advertisement

Advertisement