माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याबद्दल 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानी लोकांसह 16 YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. त्यांचा वापर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात होता.
प्रेक्षकांची दिशाभूल
हे YouTube चॅनेल दहशत निर्माण करण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरवत होते. ब्लॉक केलेल्या वाहिन्यांना 69 कोटींहून अधिक दर्शक होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2021 च्या आयटी नियमांनुसार कारवाई केली आहे. हे यूट्यूब चॅनल काही वृत्तवाहिन्यांचे लोगो आणि थंबनेल्सचाही गैरवापर करून प्रेक्षकांची दिशाभूल करत होते.
अनेक महत्वांच्या विषयांवर खोट्या बातम्या प्रसारित
या वाहिन्या जम्मू-काश्मीर, भारतीय सैन्यापासून युक्रेनमधील परिस्थितीबाबत अनेक विषयांवर दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्या प्रसारित करत होत्या. यामध्ये अशा काही दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्याही होत्या ज्यामुळे भारताच्या इतर अनेक देशांशी असलेल्या परस्पर संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
यापूर्वी 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक
केंद्र सरकारने यापूर्वी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारात गुंतलेल्या पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलसह 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत सांगितले की, हे चॅनेल्स तात्काळ प्रभावाने ब्लॉक करण्यात आल्या आहेत. भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या अशा वाहिन्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकार प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे.