पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत सदस्य म्हणून फडणवीसांची वर्णी लागली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांच्या समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जेपी नड्डा आहेत. तर सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत.
संसदीय समितीचीही घोषणा
भाजपाच्या संसदीय समितीचीही आज घोषणा करण्यात आली. यात बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण यांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. तर भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा केंद्रीय संसदीय समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष (सचिव) यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे संसदीय समितीतून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे.