औरंगाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 14) दुपारी कन्नड तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली. पैकी एक आरोपी अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
अत्याचारानंतर जीवे मारण्याची धमकी
पीडितेच्या आईने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडिता घरात एकटी होती. तेव्हा नराधमांनी घरात घुसून पीडीतेवर अत्याचार केला. अत्याचाराबाबत कुणाला सांगितल्यास आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याचाही धमकी दिली. तसेच, आरोपींपैकी काहींनी यापूर्वी पीडितेची छेडही काढली होती. आरोपी पूर्वीपासून पीडितेवर नजर ठेवून होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींनी साधला डाव
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत गरीबीची आहे. त्यामुळे आई व मुलगी दोघीही इतरांच्या शेतात मोलमजुरीला जातात. मात्र, काही दिवसांपासून पीडितेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे पीडिता कामाला जात नव्हती. आरोपी पीडितेकडे लक्ष ठेवून होते. पीडिता घरात एकटी असल्याचे कळताच आरोपींनी घरात घुसून अत्याचार केला.
आरोपींना पोलिस कोठडी
आई कामावरुन घरी येताच पीडितेने अत्याचाराबाबत आईला माहिती दिली. त्यानंतर आईने तातडीने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा जणांना अटक केली. आरोपींनी न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.