बीड : रविवारी पहाटे मुंबईनजीक झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १५ ) दुपारी ३.३० वाजता बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान विनायक मेटे यांचे पार्थिव आज रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान बीड येथे आणण्यात येणार आहे. येथील शिवसंग्राम भवनात हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता शिवसंग्राम भवनापासून अंत्ययात्रा निघणार असून दुपारी ३.३० वाजता बीडच्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस कॅनाॅल रोडवरील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.