बीड: बीड जिल्ह्यात महावितरणच्या कामांची कंत्राटे देण्यात आणि कामांमधील सुमारे १३ कोटीच्या घोटाळ्यात अखेर मोठी कारवाई झाली आहे. आ. विजयसिंह पंडीत यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीवरून महावितरणच्या बीडच्या अधीक्षक अभियंत्यासह कार्यकारी अभियंता आणि अन्य चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महावितरणच्या कामांची कंत्राटे देण्यात तसेच प्रत्यक्ष कामांमध्ये अधिकाऱ्यांनी मनमानी करत नियमांचा भंग केल्याची आणि यात १३ कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याची तक्रार आ. विजयसिंह पंडीत यांनी केली होती. त्यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यानंतर याची चौकशी झाली. त्यात समितीने अधिकाऱ्यांवर ठपका ठेवल्यानंतर अखेर महावितरणचे अधीक्षक अभियंता राजपूत यांच्यासह कार्यकारी अभियंता आणि गेवराईमधील ४ अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे
सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही
ही कारवाई वरवरची आहे. केवळ एका तालुक्याची आहे, इतरही म्हणजे पाटोदा, शिरूर आणि अन्य ठिकाणी असाच प्रकार असून अनेक अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र आपण या संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही
आ. विजयसिंह पंडीत
( आमदार गेवराई तथा मूळ तक्रारकर्ता)
यांचे झाले निलंबन
1. श्री. शाम कुंभार – सहाय्यक अभियंता, उमापूर
2. श्री. श्याम मोरे – उपकार्यकारी अभियंता, गेवराई
3. श्री. चंद्रकांत प्रधान – सहाय्यक अभियंता, तलवाडा
4. श्री. महेंद्र गुंजाळ – कनिष्ठ अभियंता, शिरसदेवी
5. श्री. सुबोध डोंगरे – कार्यकारी अभियंता, बीड
6. श्री. प्रेमसिंग राजपूत – अधीक्षक अभियंता

