Advertisement

स्मशानभूमीच्या मागणीसाठी भूममध्ये चित्तेवर बसून बेमुदत उपोषण

प्रजापत्र | Saturday, 13/08/2022
बातमी शेअर करा

भूम (प्रतिनिधी) : शहरातील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी शासनाची जागा वर्ग करा, या मागणीसाठी दोघांनी चित्तेवर बसून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
या मागणीसाठी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून धरणे व  मोर्चा तसेच बेमुदत उपोषण करण्यात आले होते. भुम शहरात साधी स्मशानभूमी नाही. आजही दलित समाजाला उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. या संदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेने चार दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर नगरपरिषदेने लेखी  पत्र देऊन दोन महिन्यांत नोंद करुन देतो असे आश्वासन दिले होते. पण दोन वर्ष उलटूनही नोंद केली नाही. 
याबाबत विचारणा केल्यास सदरील जमीन ही 221 सर्व्हे नंबर मधील त्यावर महाराष्ट्र शासन असे नांव आहे. त्यामुळे ही जमीन देण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यानंतर या जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आली. त्यात 0.46 आर जमीन बौद्ध स्म्शानभूमीची असल्याचा नकाशा दिला आहे. हा प्रस्ताव सध्या  जिल्हाधिकारी कार्यालयात असून त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. वारंवार निवेदने देऊनही शासन दखल घेत नाही. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड व विकी जावळे यांनी शनिवारी (दि. 13) बौद्ध स्मशानभूमीत चितेवर बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या जागेवर स्मशानभूमीची नोंद घ्यावी, यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. परंतु त्रुटी असल्याने तो परत आला आहे. त्रुटींची पूर्तता करुन हा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येईल. सध्या या जागेचा वापर स्मशानभूमीसाठी केला जात आहे.
- रोहिणी न-हे, उपविभागीय अधिकारी, भूम.

Advertisement

Advertisement