पाटोदा - जळगावच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई-मामाने पाटोदा तालुक्यातील तरुणाशी जबरदस्तीने लावून दिला. त्यानंतर तिला घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने जळगाव बस स्थानकातून पळ काढला आणि अंबड (जि.जालना) बस स्थानकात उतरली. त्या भेदरलेल्या अल्पवयीन विवाहितेला अंबड पोलिसांनी धीर देऊन पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथील १५ वर्षीय प्रणिता (नाव बदललेले आहे) हिच्या वडिलांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. मृत्युपूर्वी त्यांनी प्रनिताचा विवाह पाटोदा तालुक्यातील तरुणाशी ठरवला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर प्रणिताची आई आणि मामा यांनी ती अल्पवयीन असतानाही तिचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध त्या तरुणाशी करून दिला. लग्नानंतर प्रणिताने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे आई-माम्ने तिला जळगावला परत आणले. मात्र, २३ जुलै रोजी तिचा सासरा तिला घेण्यासाठी जळगावला आला. त्यानंतर सासरी निघालेल्या प्रणिताने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवून पळ काढला आणि दुसऱ्या बसने ती अंबडला आली. तिला एकटीला बस स्थानकात पाहून कोणीतरी तिच्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्थानकात पोहोचून तिला धीर दिला व पोलीस ठाण्यात घेऊन आले. तिथे प्रणिताची आपबिती ऐकल्यानंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला. तिथून हा गुन्हा पाटोदा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.