गेल्या 2 दिवसांपासून राज्यात मंत्रिमडळाचा विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यात पंकजा मुंडेंना स्थान दिले जाणार अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडेेंना स्थान देण्यात आले नाही. यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रिमंडळ बनवायचे असते, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसते. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. माझे नाव चर्चेतील नाव आहे, माध्यमांच्या आणि कार्यकर्त्यांकडून माझ्या नावाची चर्चा झाली. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसलो आहोत. त्यांना ज्यांची पात्रता आहे असे वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचे कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.