किल्लेधारुर दि.११(वार्ताहर) तालुक्यातील आसरडोह येथील एका २० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ( दि. ११ ) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
वैष्णव वैजनाथ तोडकर ( वय २० वर्ष ) रा. आसरडोह ( ता. धारुर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. वैष्णव हा सकाळी रिक्षा घेऊन मजुर महिलांना सोडण्यासाठी शेतात गेला. महिलांना सोडून चुलते जनावरे चारत असल्याचे पाहून त्याने जनावरे मी चारतो म्हणून शेतात थांबला. दुपार झाली तरी जेवण करण्यासाठी घरी न आल्याने आणि फोनही उचलत नसल्याने आईंनी दुसऱ्या भावास बोलावून आणण्याकरिता शेतात पाठवले. तो शेतात गेला असता वैष्णव याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली लोकांनी माळ पांढरे झाले. एक चांगला होतकरू व सधन घरातील तरुणाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती आडस येथील चौकीच्या पोलीसांना देण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.