ठाणे : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ई – केवायसी प्रक्रिया राबविली. परंतू, काही तांत्रिक कारणास्तव महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही. तर, काहींची झाली तरी त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसल्यामुळे महिलांमधून संताप व्यक्त केला जात आहे. परंतू, आता महिलांना या योजनेचे पैसे वेळेत मिळावे यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. अंगणवाडी सेविका यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पडताळणीसाठी ‘ई – केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक केली.या ई केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, या ई- केवायसी प्रक्रियेमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा त्रास महिलांना सहन करावा लागला. काही महिलांनी त्यातील किचकट प्रश्नांची उत्तरे देत ही प्रक्रिया पूर्ण देखील केली. परंतू, चुकीचे उत्तर दिल्यामुळे अनेक महिलांचे गेल्या दोन महिन्यांचे १५०० रुपयांचे हप्ते बँक खात्यात जमा झाले नाही. यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
लाडक्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविका बजावणार मुख्य भूमिका…
लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) केले जाणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी करणार असून त्यांची ई-केवायसी पूर्ण करणार आहेत. यासंदर्भातील सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

