मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मुंबईमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती, असे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले.
गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले.
याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘एक दोन तीन चार’, ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये पटवर्धन यांनी आपला ठसा उमटवला. त्यासोबतच होल्डिंग बॅक (२०१५), मेनका उर्वशी (२०१९), थँक यू विठ्ठला (२००७), 1234 (२०१६) आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.
प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत असून मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.