सत्तासंघर्षात अडकलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यात 35-65 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. राजभवनावर नव्या मंत्र्यांना शपथ देण्याची तयारीही जोरात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासोबतच कॅबिनेट विस्तार देखील होणार आहे. सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही ठरले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही तासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. आज रात्री शपथविधी होऊ शकतो का? या बद्दलही चाचपणी सुरू आहे.
35-65 चा फॉर्मुला
दहा ते 15 मंत्र्यांचा शपथविधी उद्या होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकतो. राज्यात सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र, आता त्याचा मुहूर्त ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार 35-65 चा फॉर्मुला ठरला असून, यात भाजप, शिंदे गट आणि इतर छोटे पक्षांतील मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे.