Advertisement

जुलै महिन्यात व्यापारातील तूट 31 अब्ज डॉलरवर

प्रजापत्र | Wednesday, 03/08/2022
बातमी शेअर करा

 देशाच्या निर्यातीत घट झाली असून व्यापारातील तूट वाढली आहे. मागील 17 महिन्याच्या कालावधीत पहिल्यांदाच निर्यातीत (Export) घट झाली आहे. तर, कच्च्या तेलाची आयात वाढल्याने व्यापारातील तूट तीनपटीने वाढून 31.02 अब्ज डॉलर इतकी झाली. 

 

 

जुलै 2022 मध्ये निर्यात 35.24 अब्ज डॉलर इतकी झाली. मागील वर्षी जुलै 2021 मध्ये देशातील वस्तू निर्यात 35.51 अब्ज डॉलर इतकी होती. त्यामुळे मागील वर्षीची तुलना केल्यास त्यात किंचीत घट झाली आहे. 

 

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2022 मध्ये देशाची आयात 43.59 टक्क्यांनी वाढून 66.26 अब्ज डॉलर इतका झाला. त्याआधी एक वर्षापूर्वी या महिन्यात आयात 46.15 अब्ज डॉलर इतका होता. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाची निर्यात वार्षिक आधारावर 19.35 टक्क्यांनी वाढून 156.41 अब्ज डॉलर इतका झाला. मागील आर्थिक वर्षातील या कालावधीत 131.06 अब्ज डॉलर इतकी निर्यात झाली होती. 

 

 

एप्रिल-जून तिमाहीत आयात वाढली
आर्थिक वर्ष 2022-23 मधील एप्रिल-जूनच्या तिमाहीत आयातीतही वार्षिक तुलनेत 48.12 टक्क्यांची वाढ झाली. या तिमाहीत भारताने 256.43 अब्ज डॉलर इतकी आयात केली. या वर्षी जुलै महिन्याच्या दरम्यान कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची आयात 70.4 टक्क्यांनी वाढून 21.13 अब्ज डॉलर इतकी झाली. जुलै 2021 मध्ये 12.4 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. आकडेवारीनुसार, मागील महिन्यात सोन्याच्या आयातीत घट झाली असून 2.37 अब्ज डॉलर इतकी आयात झाली. त्याआधी एक वर्षांपूर्वी 4.2 अब्ज डॉलर इतकी आयात करण्यात आली होती. 

 

 

व्यापार तूट तिप्पट
निर्यातीपेक्षा जास्त आयात झाल्याने या वर्षी जुलैमध्ये व्यापार तूट तिप्पट झाली आहे. ही तूट 31.02 अब्ज डॉलर इतकी  झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्यात तूट 10.63 अब्ज डॉलर होते. तर, सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील व्यापार तूट 100.01 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.

 

 

वाणिज्य सचिवांनी काय म्हटले?
वाणिज्य सचिव बी. व्हीय आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात 156.41 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.  त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात 470 अब्ज डॉलरची निर्यात करणे शक्य आहे.

Advertisement

Advertisement