देशात भाजपा हा एकच पक्ष राहील आणि इतर सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असे विधान भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. हे करताना शिवसेनाही संपत चालली आहे असे म्हणायलाही नड्डा विसरले नाहीत. प्रादेशिक पक्षांना मित्र म्हणून सोबत घ्यायचे आणि त्यानंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा किंवा सोबत राहून त्यांना संपवायचे हा भाजपचा पावित्रा राहिलेला आहे. नड्डा यांच्या बोलण्यातून फक्त तो आता समोर आला आहे इतकेच.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची भाजपची इच्छा लपून राहिलेली नव्हती फक्त हे करताना त्याला तात्वीकतेचा मुलामा कसा द्यायचा इतकाच काय तो भाजपसमोर प्रश्न होता. सारी तत्व आणि राजकीय नैतिकता गुंडाळून ठेवायची मात्र आव नैतिकतेचा आणायचा. मग कधी राष्ट्र पतन सारखे वाक्य वापरायची तर कधी कडव्या राष्ट्रवादाला खतपाणी घालायचे ही भाजपची रणनिती राहिलेली आहे, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातही काहीतरी उदात्त कारण दाखवायचे होते. ईडीचा वापर करून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हे घडवून आणले हे आता लपून राहिलेले नाही. आज एकनाथ शिंदे हे आपला गट हीच खरी शिवसेना म्हणत असले तरी भाजप सर्वांर्थाने शिवसेना संपवायलाच निघाला आहे हेच भाजप नेत्यांच्या सातत्याच्या वक्तव्यातून समोर येत आहे.
अर्थात भाजपचे शिवसेना संपविण्याचे स्वप्न आजचे नाही. 1989 ला पहिल्यांदा भाजप सेनेची युती झाली आणि 1995 ला महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवसेना आपल्याला वरचढ आहे ही भावना भाजपच्या नेत्यांना कायम खुपत आलेली होती. आपण राष्ट्रीय पक्ष असतांनाही आपल्याला मातोश्रीवर जावे लागते हे भाजपच्या पचनी पडलेले नव्हते. मात्र त्यावेळचे नेतृत्व संयमी होते, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंसारखा बहुजन चेहरा होता तर शिवसेनेच्या बाळासाहेबांचा एक वचक होता. त्यामुळे ही युती टिकली मात्र असे असतांनाही 1999 च्या निवडणूकीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरांची फौज उभी केली होतीच अर्थात तो किमान संसदीय लोकशाहीचा भाग तरी होता आता तर भाजपने सारेच तालतंत्र सोडलेले आहेत. शिवसेनेमध्ये फुट घडवून आणल्यानंतर आता शिवसेना संपत चालली आहे असे सांगणे याचा दुसरा अर्थ एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला कायमचे आश्रीत करून ठेवणे असाच होतो. शिवसेना जर एकनाथ शिंदेंचीच खरी राहणार असेल तर मग भाजप ज्या शिवसेना संपविण्याच्या गप्पा मारीत आहे तर त्यांना नेमके कोणाला संपवायचे आहे? एकनाथ शिंदे गटाची उपयुक्तता भाजपच्या दृष्टीने केवळ उद्धव ठाकरेंना सत्ताभ्रष्ट करणे इतकीच होती असेच आता म्हणावे लागेल. नाही तर शिंदे फडणवीसांनी शपथ घेवून महिना उलटल्यानंतरही त्यांचे मंत्रीमंडळ गठीत होत नाही याचा दुसरा अर्थ निघतो तरी काय?
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वत्र भाजपने त्यांच्या सोबतच्या पक्षांची अशीच वाट लावलेली आहे. बिहारात नितीश कुमारांना भलेही मुख्यमंत्रीपद दिले असेल पण तेथेही त्यांचा जनाधार कसा कमी होईल याचाच प्रयत्न भाजपने सातत्याने केला. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाची अवस्था काय झाली होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आसम गण परिषदेपासून ते इतर जवळपास सर्वच राज्यामधील एकेकाळी भाजपच्या जवळ आलेल्या मित्र पक्षांचे आज काय हाल झाले आहेत आणि केंद्रातील सत्ता रालोआची असल्याचे सांगितले जात असले तरी घटक पक्षांना किती मंत्रीपदे मिळाली आणि त्यांना किती अधिकार आहेत हे पाहिले तर भाजपचा अंतस्थ हेतू समोर येतो. आतापर्यंत अंधारातून आपला हेतू साध्य करण्याचे काम भाजप करत आला होता. आता एकनाथ शिंदे प्रकरणानंतर जे.पी. नड्डांसारख्या नेत्यांनी आपले मनसुबे थेट उघड करणे सुरू केले आहे. नड्डा जे बोलले तोच भाजपचा खरा चेहरा आहे. यांना बहुपक्षीय लोकशाही कधीच मान्य नव्हती. ‘एकचालकानुवर्तीत्व’ हा ज्या संस्थेचा पाया आहे त्या संस्थेचे राजकीय अंग असलेला भाजप नाही तरी केवळ एकपक्षीय हुकूमशाहीच्या पलीकडे वेगळा विचार कोणता करेल.