राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. “मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली,” असं म्हणत कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला क्षमा करण्याचं आवाहन केलं आहे. या निवेदनात त्यांनी त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही, असंही नमूद केलं.
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “२९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.”