Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - विंचू पिंडीवरी बैसला

प्रजापत्र | Monday, 01/08/2022
बातमी शेअर करा

एकदा का आपला मर्यादाभंग सहजी पचविला जातो, किंवा लोक तो गुमान सहन करतात असे लक्षात आले की मग माणूस पुन्हा पुन्हा तेच करु लागतो. आणि नंतर लोकनिंदेची किंवा टीकेची तमा न बाळगण्याचा कोडगेपणा त्यात येतो. अनेकदा त्या व्यक्तीच्या स्थानामुळे त्याला संरक्षण मिळते, मात्र यामुळे त्याचा कोडगेपणा वाढत असेल अन सामाजिक श्रध्दास्थानांना ती व्यक्ती धक्का लावणार असेल तर मग ती व्यक्ती राज्यपाल असली तरी त्यांना तुकोबांचा 'महाराष्ट्र धर्म ' शिकवावाच लागेल.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या माथी भाजपने मारलेली ही व्यक्ती संवैधानिक पदाच्या आडून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. सारे संवैधानिक संकेत तर केंद्राच्या इशाऱ्यावर यांनी केंव्हाच मोडीत काढले आहेतच, पण राजभवनात बसून राजकारण करणारे कोश्यारी उद्दामपणे महाराष्ट्रीय अस्मितांचा अवमान करित आहेत. कधी छत्रपती शिवरायांपेक्षाही समर्थ रामदासांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न असेल किंवा अगदी महाराष्ट्राची बहूजन अस्मिता असलेल्या फुले दामप्त्याबद्दल काढलेले अनुदगार असतील, मागच्या काही काळात भगतसिंह कोश्यारी सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करीत आले आहेत. मराठी मनाच्या भावनांचा अपमान करीत आले आहेत. मात्र केवळ महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची अडवणूक करण्याच्या एकमेव कर्तृत्वामुळे आणि दिल्लीच्या आशीर्वादानेच राजभवन चालत असल्याने राज्यातील भाजपाळलेल्या भक्तांनाही कधी याचे वाईट वाटले नाही. मात्र यामुळे कोश्यारींचा उद्दामपणा सातत्याने वाढत गेला आहे. आणि त्याचीच परिणिती आता त्यांनी मुंबई बद्दलच्या वक्तव्यातून महाराष्ट्राचाच अपमान केला आहे.

 

मुंबईच्या संदर्भाने केंद्र सरकार आणि गुजरातला असलेली मळमळ लपून राहिलेली नाही. ही मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही. शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र मिळालेला आहे, आणि याच राज्याचे राज्यपाल मुंबईचे वैभव केवळ गुजराती, राजस्थान्यांनमुळे असल्याचे सांगत असतील तर आता असली मानसिकता ठेचायलाच हवी. स. का. पाटील किंवा मोरारजी सारखे महाराष्ट्र द्वेष्टे देखील या महाराष्ट्राने कधी सहन केले नाहीत, त्यांना त्यांची जागा दाखविली, पण आता कोश्यारींसारखे  लोक संवैधानिक पदांवर बसून, त्या पदांच्या ढाली आडून महाराष्ट्र धर्म बुडवू पाहत आहेत.

 

राज्यपालांच्या वक्तव्याचे सर्वत्र तिव्र पडसाद उमटत आहेत, मात्र केवळ राजकीय व्यक्तींनी निषेध केल्याने मस्तवाल केंद्र सरकार राज्यपालांना काही सांगेल किंवा त्यांची उचलबांगडी करेल असे नाही. आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणविसांच्या बैलगाडी सरकारला महाराष्ट्र धर्माची काही चाड आहे असेही नाही. यांच्याकडे काही स्वाभिमान शिल्लक असता तर त्यांनी कोश्यारींना चार शब्द सुनावले असते. मात्र ही जोडी तसे काही करणार नाही. उध्दव ठाकरेंनी आता राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची वेळ आल्याचे सांगितले असले तरी, ते कोणा एकाने नाही तर साऱ्या महाराष्ट्राने हे करण्याची वेळ आली आहे. हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म आहे.

 

महाराष्ट्र ही संतांच्या विचारांनी पोषक झालेली भूमी आहे. महाराष्ट्रीय मानसिकता 'भले ते देऊ कासेची लंगोटी'ची असली तरी वेळ आल्यावर नाठाळाच्या माथी काठी मारण्याची शिकवण देखील याच मातीची आहे. आणि असे नाठाळ जर पवित्र ठिकाणी बसून अधमपणा करित असतील तर

विंचू पिंडीवरी बसला ।
देवपूजा न चाले त्याला ।
तेथे पैजारेंचे काम ।
अधमासी तो अधम ।।”
हा तुकोबांचा महाराष्ट्र धर्म आहे.

Advertisement

Advertisement