युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंत शुलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी कटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. शुलीची ही कामगिरी भारतासाठी एकाच दिवसात दुसरं सुवर्णपदकाची कमाई करणारी कामगिरी ठरली. शुलीच्या आधी युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.
शुलीने स्नॅच प्रकारामध्ये १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. तर शुलीनेच क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १७० किलोसहीत एकूण ३१३ किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रम आपल्या नावे करुन घेतला. मागील वर्षी जागतिक स्तरावरील ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये शुलीने रौप्य पदकाची कमाई केली होती. शुलीने आपल्या तिसऱ्या संधीमध्ये राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवून देणारे दोन्ही लिफ्ट केले. मलेशियाच्या ई हिदायत मोहम्मदला या स्पर्धेत रौप्य तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळालं. मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचललं.