मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या घराबाहेर आले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. "संजय राऊत तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ हैं...डरेंगे नही-लढेंगे, आव्वाज कुणाचा शिवसेनेचा..." अशा जोरदार घोषणांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणेने राऊतांच्या अंगातही उत्साह संचारला. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर येताना गळ्यात भगवं उपरणं घातलं होतं. शिवसैनिकांचं समर्थन पाहून राऊतांनी आपले दोन्ही हात उंचावून, शिवसैनिकांना अभिवादन केलं. आपल्या गळ्यातील भगवं उपरणं हवेत फडकावून भगवा नेहमी फडकत राहिन, भगव्याला हरवणं सोपं नाही, असा इशाराच दिला. राऊतांच्या या कृतीनंतर शिवसैनिकांमध्ये जोरदार उत्साह संचारला. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राऊतांनी आपली वज्रमूठ आवळून शिवसेनेसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. दुसरीकडे याचवेळी राऊतांचं कुटुंब बंगल्याच्या गॅलरीमधून हा सगळा भावनिक प्रसंग पाहत होतं. राऊतांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू होते. तर राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही डोळ्याच्या कडा अश्रूंनी दाटल्या होत्या. तर तिसरीकडे ज्याप्रकरणी राऊतांवर ईडीने कारवाई केलीये, त्या पत्राचाळ प्रकरणाचा एकही कागद आमच्या घरात सापडला नाही, असं राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत ठासून सांगत होते. असं असलं तरी सुनील राऊतांच्या आरोपांचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी खंडन केलं. आमचा गृहपाठ पक्का आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
प्रजापत्र | Sunday, 31/07/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा