Advertisement

केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द

प्रजापत्र | Saturday, 30/07/2022
बातमी शेअर करा

 केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी रद्द केल्याने तेलाच्या दरात काहीशी स्वस्ताई आली आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐन महागाईच्या दिवसांत काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच श्रावणातील सणांनिमित्त चमचमीत खाण्याची संधीही मिळणार आहे.  

 

 

सूर्यफुल तेलाची आवक युक्रेन, रशिया येथून, तर सोयाबीन तेलाची आवक शिकागो, पामतेलाची आवक इंडोनेशिया व मलेशियातून होते. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळेही तेलाचे भाव वाढले होते. परंतु, सध्या इंडोनेशिया व मलेशियामध्ये पामतेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील तेलाचे दर घटल्याने कमी दरात तेथे तेलाची विक्री होत आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेतही तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी देशात आणि राज्यात खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घट होत आहे. शेंगदाणा आणि राईच्या तेलाचे दर मात्र स्थिर आहेत, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. महिन्याभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता. आता दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या दरातही घट झाली आहे. आता श्रावणात येऊ घातलेल्या विविध सण-उत्सवांच्या काळातच तेलाचे भाव कमी झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Advertisement

Advertisement