येरमाळा दि.२९ (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराजावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असतानाच दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत महिलेच्या अंगास झोंबाझोंबी करीत महिलेच्या विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे विरुध्द येरमाळा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पीडित महिला परळी तालुक्यातील रहिवाशी असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
दि.२८ रोजी गुरुवार असल्याने मलकापुर येथील श्रीक्षेञ दत्त मंदिर संस्थान (मठ) चे एकनाथ महाराज लोमटे यांच्या दर्शनसाठी परळी येथील ३५ वर्षीय महिला मठातील दर्शन मंडपामध्ये बसली असता महाराजांनी महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत महिलेस शरीरसंबंधाची विचारणा केली. त्यास नकार दिल्यानंतर महाराजांनी मागच्या वेळी पेढा खायला दिल्यानंतर तु झोपली होती, तेव्हा आपण तुझ्यावर बलात्कार केला व त्याचा व्हीडिओही तयार केल्याचे सांगितले.यावेळी पीडितेने महाराजांना धक्काबुक्की करून तिथून पळ काढला.यानंतर मंदिर परिसरामध्ये प्रंचड गोंधळ उडाला होता.पीडितेने मध्यराञी १ वाजेच्या सुमारास येरमाळा पोलीस ठाणे गाठून एकनाथ महाराज लोमटे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.