गणेशोत्सव अवघ्या महिनभरावर आला असून यंदाच्या उत्सवाला महागाईचा फटका बसला आहे. यामध्ये, केंद्र सरकारने लावलेल्या जीएसटीमुळे गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने गणेश मूर्तीच्या किंमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यातच, यंदा या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली असल्याने भाविक आणि कारखानदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. परंतु, गणेश मूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे 40 ते 50 टक्के वाढ झाल्याने गणेश मूर्तींच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, पेण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तींना परदेशात मॉरीशिअस, थायलंड, ऑस्ट्रेलिया, युरोप सारख्या अनेक देशात मागणी असल्याने सुमारे 25 ते 30 हजार गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत. तर, गणेशमूर्तींच्या दरात वाढ झाली असताना भाविकांमधील गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे.