अंबाजोगाई - शहरातून बीडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील टायरचे दुकानाचे शटर उचकून चोरट्यांनी तब्बल २३ लाख ८३ हजार रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली. या मोठ्या चोरीने शहरात खळबळ उडाली असून अद्याप चोरट्यांचा कसलाही सुगावा लागलेला नाही.
अंबाजोगाई - बीड रोडवर आर्यवीर मंगल कार्यालयाच्या समोर प्रवीण बाळासाहेब करपे (रा. जवळबन, ता. केज) यांचे वाहनांच्या टायरचे दुकान आहे. गुरुवारी दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या वेळी दुकान बंद करून ते गावाकडे निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी रात्रीतून कधीतरी दुकानाचे शटर टामीच्या साह्याने तोडून उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ६५२ टायर आणि ट्यूब व १,७८० स्वतंत्र ट्यूब असा एकूण २३ लाख ८३ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमाल हेऊन चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास प्रवीण करपे यांना दुकान फोडल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी प्रवीण करपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सोनेराव बोडखे करत आहेत.