प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालांची भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा अमृतसरजवळ झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन संशयित शार्पशूटर आणि पंजाब पोलिसांच्या तुकडीमध्ये बुधवारी (२० जुलै) दुपारी दोनच्या सुमारास अटारी सीमेजवळ चकमक झाली. या चकमकीत पंजाब पोलिसांनी दोन्ही संशयितांचा खात्मा केला. अमृतसरजवळच्या गावात चकमक सुरू झाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही चकमक जवळपास ३ तास चालली.
अटारी सीमेजवळच्या भाकना कालन गावामध्ये ही चकमक झाली. हल्लेखोर गावातील एका बंगल्यामध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी या बंगल्याला सर्व बाजूंनी घेरलं. ज्या ठिकाणी ही चकमक झाली, तो भाग भारत पाकिस्तान सीमेपासून जवळ असल्याने हे हल्लेखोर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून एके-४७, पिस्तुल व इतर साहित्य जप्त केलं आहे.
या चकमकीत ३ पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय एका कॅमेरामनलाही गोळी लागली. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जगरुप रोपा आणि मनप्रित कुसा असं या दोन संशयित हल्लेखोरांची नावं आहेत. यापैकी एका हल्लेखोराने सर्वात आधी एके-४७ मधून मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता.