औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात 'छत्रपती' या शब्दाची भर घालत 'छत्रपती संभाजीनगर' असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार हे अल्पमतात असूनही राज्यातील काही शहरांच्या नामांतराचा घाईगडबडीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांबाबत पुढे काही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आम्ही नामांतराच्या निर्णयांना स्थगिती दिली होती.
येत्या अधिवेशनात ठराव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या पुढील अधिवेशनात नामांतराबाबतचे हे ठराव मांडण्यात येतील. त्यानंतर ठराव केंद्राकडे पाठवले जातील. केंद्राकडून लवकरात लवकर मंजूरी मिळावी, म्हणून राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करणार आहे.