राज्य परीक्षा परिषदेतर्फे २० जुलैला होणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ही परीक्षा आता ३१ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, २० जुलैच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रच ३१ जुलैच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २० जुलैला राज्यभरातील केंद्रांवर एकाचवेळी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. तसेच विद्यार्थीहित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता परीक्षा ३१ जुलैला घेण्यात येईल.