Advertisement

श्रीलंकेत आणीबाणी:राष्ट्रपतींनी देश सोडून पळ काढल्याने जनतेत संताप

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले आहे. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत आहेत. तर हजारो लोकांचा मोर्चा संसद भवनाकडे कूच करत आहे. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

 

 

हजारो लोक संसद भवनाकडे कूच करत असल्याने ठिकठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्याचवेळी दोन गटात आपापसात भिडल्याने त्यात 12 जण जखमी झाले आहेत.

 

 

तर दुसरीकडे, 139 दिवसांच्या विरोधानंतर राजपक्षे यांनी राजीनामाही दिला आहे. त्यांचा राजीनामा आज संसदेत जाहीर केला जाऊ शकतो आणि त्यासोबतच हंगामी राष्ट्रपतींच्या नावाचीही घोषणा केली जाणार आहे.

 

 

श्रीलंकेच्या हवाई दलाच्या माध्यम संचालकांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना पत्नी आणि दोन अंगरक्षकांसहीत मालदीवमध्ये प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन, सीमाशुल्क आणि इतर कायद्यांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून संपूर्ण परवानगी देण्यात आली होती. 13 जुलै रोजी सकाळी त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करून देण्यात आले.

 

 

मंगळवारी देश सोडण्याचा केला होता प्रयत्न

8 जुलैपासून गोटबाया कोलंबोमध्ये दिसले नव्हते. ते 12 जुलै रोजी मंगळवारी नौदलाच्या जहाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बंदरातील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पासपोर्टवर शिक्का मारण्यासाठी व्हीआयपी सूटमध्ये जाण्यास नकार दिला. राजपक्षे यांनी देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे इतर सार्वजनिक सुविधांचा वापर करू शकत नसल्याचे सांगितले, परंतु अधिकार्‍यांनी ते मान्य केले नाही.
 

Advertisement

Advertisement