महागाईचे (Inflation) चटके कमी होते की काय म्हणून आता राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा (Electricity bill hike shock) शॉक सहन करावा लागणार आहे. बिल वाढीचा शॉक लवकरच राज्यातील ग्राहकांना बसेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात वीज दरात कसलीही वाढ करण्यात आली नव्हती. मध्यंतरी दर वाढीचा प्रस्ताव आला होता. मात्र तो टाळण्यात आला होता. कोरोना महामारीचे (Covid-19) कारण देत ही दरवाढ टाळण्यात आली होती. परंतू, वीज उत्पादन खर्च वाढल्याने आणि कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी आता वीज दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. महाराष्ट्रात युनिटमागे दोन रुपये वीज वाढ होण्याचा दावा केला आहे तर देशाची राजधानी दिल्लीतील विद्युत विनियामक आयोगाने(DERC) दिल्लीतंर्गत विविध भागात वीजेच्या दरात 2 ते 6 रुपये वाढीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे तेथिल ग्राहकांना वीजेचा मोठा शॉक लागला आहे.
राज्यात युनिटचा हिशेब
महाराष्ट्रात नागरिकांना पुढील 5 महिने वीज बिल वाढीचा झटका बसू शकतो. जर तुम्ही महिन्याला 300 युनिट पेक्षा जास्त विद्युत वापर करत असाल तर तुम्हाला 2 रुपये प्रति युनिट बिल अधिक द्यावे लागेल. वाढता वीज उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी ही दरवाढीची सोय करण्यात आल्याचा विद्युत मंडळाने दावा केला आहे. वीज बिलातील ही वाढ जून ते ऑक्टोबर दरम्यान राहील.
गेल्या 2 वर्षांपासून किंमतीत वाढ नाही
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड(MSEDCL) यांच्या दाव्यानुसार, गेल्या 2 वर्षांत इंधन किंमतीतीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकांकडून कंपनीने कुठलीही दरवाढ न करता ज्यादा बिल आकारले नाही. परंतू यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरवाढीचा शॉक केवळ घरगुती वापरकर्त्या ग्राहकांनाच बसेल असे नाही तर औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही वीजदरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.