भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या माटुंग्यामधील घराबाहेर पैशांनी भरलेली बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये पैशांसोबत सोने आणि चांदीच्या मूर्तीदेखील आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. ही बॅग नेमकी कोणी ठेवली याचा शोध घेतला जात आहे. हा चोरीचा मुद्देमाला असावा असा प्राथमिक संशय असून पोलीस तपास करत आहेत.
नेमकं काय झालं?
प्रसाद लाड यांच्या माटुंग्यातील निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तीने ठेवलली ही बॅग सुरक्षारक्षकाला आढळली. ही बॅग सापडल्यानंतर काही वेळासाठी भीती पसरली होती. यानंतर त्याने प्रसाद लाड यांना यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता बॅगेत पैशांची नाणी तसंच सोने, चांदीच्या मूर्ती सापडल्या आहेत. प्रसाद लाड यांच्या घराला कडेकोट बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे बॅग सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस सध्या तपास करत असून सीसीटीव्हीदेखील तपासलं जात आहे.