शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ४० आमदारांचा मोठा गट घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. यानंतर दोन तृतियांश आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे मूळ शिवसेना कोणती? अशी चर्चा सुरू झाली. लोकांमधून निवडून आलेले दोन तृतियांश लोकप्रतिनिधी ज्या बाजूला असतील, तीच खरी शिवसेना, अशी भूमिका बंडखोर आमदारांकडून सातत्याने मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार असल्याचं स्पष्ट करतानाच शिवसेना पक्ष देखील कुणीही घेऊन जाऊ शकत नाही, कायद्याने ते शक्य नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“शिवसेना काही अशी गोष्ट नाहीये की कुणीतरी घेऊन पळत सुटला. कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतो. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी निवडून जात असतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले
“हा संभ्रम निर्माण केला जात आहे. मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या भ्रमामध्ये अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. त्यात असंख्य मतदार, पदाधिकारी, सदस्य असतात. त्या पदाधिकाऱ्यांना हे असंच उचलून कुणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांना पैशांच्या दमदाटीवर कुणी घेऊन जाऊ शकत नाही. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहील. विधिमंडळात जे आमदार माझ्यासोबत राहिले, त्यांचं मला जाहीर कौतुक करायचंय. त्यांनाही आमिषं दाखवण्यात आली, धमक्याही देण्यात आली. तरी काहीही झालं तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.