Advertisement

14 आमदारांनाच नोटीस का? आदित्य ठाकरेंना का नाही?

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई: शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर आमदारांकडे गटनेतेपद आणि पक्षप्रतोदपद आल्यानंतर या आमदारांनी आता थेट शिवसेनेच्याच आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी व्हीप मोडल्याने तुमच्यावर अपात्रतेची कारवाई का करू नये? असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. शिवसेनेच्या एकूण 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे गटाने नोटीस बजावताना आदित्य ठाकरेंना का वगळलं? या मागची शिंदे गटाची रणनीती काय आहे? ही खेळी तर नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. मात्र, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणूनच आदित्य यांना नोटीस बजावण्यात आली नाही, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

 

 

भरत गोगावले यांनी वृत्त वहिनींशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं तेच आम्ही केलं आहे. आम्ही सर्वच विसरलो नाही. मुख्यमंत्र्यांननी सांगितलं आदित्य ठाकरेंना बाजूला ठेवून 14 जणांना नोटीस द्या. म्हणून दिली, असं गोगावले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोर्टातील अपात्रतेच्या नोटीशीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाच, सहा दिवस बाकी आहे. 11 तारखेला दूध का दूध पानी का पानी होईल. आमच्याकडे येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. कमी होणार नाही. वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हा पाहून इतरांनी निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
 

Advertisement

Advertisement