पंतप्रधानांच्या उपस्थितीत अजित पवारांना भाषणाची संधी नाकारली गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाला तशी संवैधानिक किंमत नसते असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणविसांना काही काळातच उपमुख्यमंत्री म्हणूनच शपथ घ्यावी लागली. हा खरेतर नियतीनेच त्यांच्यावर उगविलेला सुड आहे असेच म्हणावे लागेल. मात्र त्याहीपेक्षा या निर्णयाने राजकारणात कोणीच सत्तेचा अमरपट्टा लेऊन आलेला नसतो हेच स्पष्ट झाले आहे. वाढता अहंकार तुमची ऊंची कमी करायला जबाबदार असतो हेच फडणवीसांच्या उदाहरणावरून समोर आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. उध्दव ठाकरेंच्या बाबतीत किमान होत्याचे नव्हते होणार आहे याची त्यांनी मानसिकता तरी करुन घेतली होती. पण फडणवीसांच्या बाबतीत हा फार मोठा धक्का म्हणावा असेच होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही वर्षांत देवेंद्र फडणवीसांची उंची फारच वाढली होती. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील भाजप म्हणजे फडणवीस असेच समीकरण झाले होते. हे करताना त्यांनी पंकजा मुंडे असतील किंवा आशीष शेलार, एकनाथ खडसे असतील अशा सर्वच नेत्यांचे पंख कापले. जे जे म्हणून कोणी आपल्या वाटचालीत अडचणीचे ठरतील त्यांना पध्दतशीरपणे संपविण्याचे काम फडणवीसांनी केले. हे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराच्या अधिकाधिक जवळ जाण्यात फडणवीस यशस्वी झाले होते. मात्र हे सर्व होत असताना त्यांच्या राजकीय उंची सोबतच त्यांचा अहंकार देखील वाढत गेला. त्यांच्या वागण्या बोलण्यातून, त्यांच्या देहबोलीतून हे वारंवार दिसत होते.
फडणवीस मोदींच्या जवळ असल्याने त्यांच्याबद्दल कोणी बोलत नव्हते, किंबहुना जे कोणी तक्रार करतील त्यांचेच पंख कापले जात असल्याने त्यांच्याबद्दल तक्रारी करायला कोणी धजावत नसायचे. मात्र असे असले तरी राजकारणात प्रत्येक व्यक्ती वेळेची वाट पाहत असतो आणि राजकारणात तशी वेळ येतही असते. फडणविसांच्या बाबतीत तीच वेळ आली. एकीकडे मोदींच्या जवळ जाणारे फडणविस महाराष्ट्रात स्वत:ची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ रंगवीत असतानाच त्यांचे कार्यकर्ते 'आज का देवेंद्र, कल का नरेंद्र' अशा घोषणा देण्यापर्यंत पोहचले होते. आता ही उंची अमित शहांना कशी पडणार होती?
खरेतर ही अतिरेकी वाढलेली उंची मोदी शहांना खुणा हे फडणविसांच्याच लक्षात यायला हवे होते. मात्र अधिकाराच्या उन्मादात व्यक्ती अनेक गोष्टी विसरतो. महाराष्ट्राच्या जातीय ध्रुवीकरण झालेल्या राजकारणात आपण अल्पसंख्याक आहोत हे देखील फडणवीस विसरले आणि म्हणूनच संघाचे लाडके असलेल्या फडणविसांचाही 'करेक्ट कार्यक्रम' मोदी शहांनी केला आहे. ज्यांना वाजपेयी-आडवाणींची उंची सहन झाली नव्हती, ज्यांना मासबेस गोपीनाथ मुंडे पडले नव्हते, त्या मोदी शहांना फडणविसांचा अहंकार कसा सोसवेल? फडणवीस 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' हा संस्कार विसरले आणि त्यातूनच त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
बातमी शेअर करा