लातूर : मौजे थेरगाव, ता. शिरूर अनंतपाळ येथील जवान सुर्यकांत शेषेराव तेलंगे
हे कर्तव्य बजावत असताना पठाणकोट येथे शहिद झाले असल्याचा निरोप गावात मिळताच आज गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवला. शहिद सुर्यकांत तेलंगे यांचा
पार्थिव उद्या मंगळवारी दुपारी थेरगावात येईल, अशी माहिती गावकऱ्यांना पोलिसांकडून मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सुर्यकांत शेषेराव तेलंगे हे सैन्यदलात ७ वर्षांपूर्वी भरती झाले होते. ते एका शेतकरी कुटुंबातून होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सुर्यकांत तेलंगे हे अत्यंतम नमिळाऊ असे आमच्या गावचे सुपूत्र होते. ते शहिद झाल्याचे कळताच थेरगाव गावावर शोककळा पसरली आहे,अशी खंत गावातील प्रतिष्ठीत नागरिक राजकुमार पाटील, धनंजय पाटील यांनी दिली आहे. शहिद जवान सुर्यकांत तेलंगे यांच्या पार्थिवावर गावामध्ये नेमके कोठे अंत्यसंस्कार करायचे हे महसूल प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर निश्चीत करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. थेरगाव येथील जवान सुर्यकांत तेलंगे शहिद झाल्याची बातमीकळताच गाव, तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून शहिद जवानास श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.