एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करत पक्षालाच आव्हान दिल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. आत्तापर्यंत हा गट पुन्हा मुंबईत येऊन पक्षासोबत तडजोड होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरल्याची माहिती समोर येत आहे. या नावासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं एकनाथ शिंदे गटाची वाटचाल सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
‘या’ नावानिशी आघाडीतून बाहेर पडणार?
एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असं ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नावावर शिवसेनेकडून कायदेशीर आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या नावाची लवकरच एकनाथ शिंदे गटाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे. एकत्र निवडणुका लढवूनही आपण भाजपापासून दूर झालो, तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते दूर झाले का? रस्त्यावर आले का? मोडतोड केली का? पण तरी उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय मान्य केला. पण जेव्हा शिवसेनेचं अस्तित्वच संपवायला आपले मित्रपक्ष निघाले, तेव्हा गेल्या दीड वर्षापासून आम्ही ही भूमिका मांडली आहे. ती उद्धव ठाकरेंना सातत्याने सांगितली आहे”