Advertisement

“जास्तीत जास्त सत्ता जाईल,” संजय राऊत स्पष्टच बोलले

प्रजापत्र | Wednesday, 22/06/2022
बातमी शेअर करा

एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आमच्यात अजिबात नाराजी नाही असा दावा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि आपल्यात बोलणं झालं असल्याची माहितीदेखील संजय राऊतांनी दिली असून त्यांनी कोणतीही मागणी केली नसल्याचं मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. शिंदेंचा बंड घरातला विषय आहे असं सांगताना संजय राऊत यांनी भाजपा प्रवेशाचा दावा फेटाळून लावला.

“शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे”.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आमदार नाराज असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊतांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. “त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत. असं कोणत्याही आमदाराने म्हटलं असेल असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले.

Advertisement

Advertisement