सुरत-शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं. त्यामुळं शिवसेनेकडून आमदार शिंदे यांना सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. मात्र, शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल लागत असून त्यामुळं महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
एकनाथ शिंदे हे आज दुपारी गुजरातमधून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, आजच्या पत्रकार परिषदेतून ते कोणते मुद्दे मांडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊतांचा दिल्ली दौरा रद्द
राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राऊतांनी दिल्ली दौरा रद्द करत महाराष्ट्रात थांबणार आहेत. शिवसेनेत फूट पडली असल्याच्या चर्चानंतर आता पक्ष डॅमेज कंट्रोलसाठी काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.