पुणे - आळंदीत अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या एका चिमुकलीचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे. या मुलीने तिला आळंदीत सोन्याचं मंगळसूत्र सापडल्यानंतर कोणत्याही लोभाला बळी न पडता ते मंगळसूत्र प्रामाणिकपणे पोलिसांना दिलं. या मुलींचं नाव पूजा भामरे असं आहे. ती दररोज सकाळपासूनच आळंदीत एक-एक रुपयांसाठी माऊलींच्या मुख्य मंदिर परिसरात भाविकांना अष्टगंध लावण्याचा आग्रह करते. कोणी गंध लावतं, तर कोणी नाही. बरेच गंध लावून घेतात, पण पैसे देत नाहीत. असं असताना देखील पूजाने हजारो रुपयांचं सोन्याचं मंगळसूत्र पोलिसांना सुपूर्द केलं. त्यामुळे तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. तिच्या पाठीवर आळंदी पोलिसांनी कौतुकाची थाप दिली आहे. आळंदीत पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांचा ओघ वाढला आहे. दररोज हजारो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माऊलींच दर्शन घेण्यासाठी येतात. बऱ्याचदा महिला चोरी होईल या उद्देशाने सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून कंबरेला ठेवतात. अशाच एका महिलेचं मंगळसूत्र पडलं. ते पूजाला सापडलं. तिने प्रामाणिकपणे आळंदी पोलिसांना सुपूर्द केलं आहे.
पूजासह अथर्व आणि स्वरा हे देखील अष्टगंध लावून पै-पै जमा करतात. त्यांना या कामातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात, असं पूजाने सांगितलं आहे. दरम्यान, पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वणवण करतात. परंतु, सोन्याचं मंगळसूत्र सापडून देखील त्यांना कुठलीही लालसा आली नाही. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ते पोलिसांना दिलं.पोलीस उपायुक्त मंचर इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी या मुलांचं कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. तसेच ज्या महिलेचं मंगळसूत्र हरवलं त्या महिलेने आळंदी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.