Advertisement

अविरत सेवाव्रत

प्रजापत्र | Saturday, 24/10/2020
बातमी शेअर करा

बीड : कोरोनाला सारे जग घाबरत होते, अगदी कुटुंबातील कोणाला बाधा झालीच तर काय करायचे हा प्रश्‍न पडायचा. अशा काळात म्हणजे सुरुवातीच्या तीन महिन्यात घराशेजारच्या एका कुटुंबात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यांना औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले गेले आणि त्यानंतर त्या कुटुंबातील इतरांची तपासणी करायचा प्रश्‍न निर्माण झाला. कुटुंबातील कर्ते औरंगाबादेत, मग नातेवाईकांना तपासणीसाठी न्यायचे कोणी? हा प्रश्‍न उपस्थित झाला आणि भितीवर माणुसकीने मात केली. त्या कुटुंबातील सदस्यांना घेवून एक तरुण रुग्णालयात गेला. त्या कुटुंबातील आणखी सात जण कोरोनाग्रस्त निघाले आणि त्यानंतर मात्र त्या तरुणाचा रुग्ण सेवेचा प्रवासच सुरु झाला. आज त्या प्रवासाला सात आठ महिने होत आहेत. अँटीजन तपासण्या करुन घेणे, रुग्णांना रुग्णालयात पोहचविणे, तिथे काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी धडपडणे, वेळेची तमा न बाळकता कोणत्याही क्षणी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज असणे हे आता त्या तरुणाच्या अंगवळणी पडले आहे. या व्यक्तीचे नाव आहे अमर नाईकवाडे.
                   बीड शहराच्या मोंढा भागाचे नगरसेवक म्हणून नेतृत्व करणारे अमर नाईकवाडे व्यापार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आक्रमक असतात. हा प्रभाग जसा व्यापार्‍यांचा तसेच रोज हातावर पोट असणार्‍या कष्टकर्‍यांचा देखील. त्यामुळे कोरोनाची टाळेबंदी जाहीर होताच या कष्टकर्‍यांसमोर रोजच्या जगण्याचा प्रश्‍न होता. या कष्टकर्‍यांसाठी किराणा साहित्य वाटण्याचा उपक्रम हाती घेत अमर नाईकवाडेंनी कोरोनाचा वेगळ्या पध्दतीने सामना करणे सुरु केले. त्यानंतर मात्र थेट कोरोनाग्रस्तांनाच मदत करण्याची परिस्थिती निर्माण झाली. ‘कोरोनाची भिती सर्वांनाच वाटत होती, पण आपल्या शेजारी पाजारी रुग्ण निघू लागल्यानंतर त्यांना मदत करायची नाही का? आणि अशा वेळी नाही तर कधी धावून जायचे? माझ्या प्रभागात रोजच मोठ्या प्रमाणावर रुग्ण निघत होते. मग त्यांना वाऱ्यवार कसे सोडणार?’ असे सांगत अमर नाईकवाडेंनी कोरोनाग्रस्तांसाठी उपचार मिळवून देण्याचे माध्यम ते कसे झाले हे सांगितले. आज सहा सात महिन्यांपासून अमर नाईकवाडे सातत्याने कोरोनाग्रस्तांना उपचार मिळवून देण्यासाठी झटत आहेत. बीड जिल्ह्यात होम आयसोलेशनचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला त्यासाठीही नाईकवाडेंचाच पाठपुरावा होता. आणि आताही अगदी भल्या पहाटेची वेळ असेल किंवा मध्यरात्रीची, कोरोनाग्रस्ताला कोठे काही अडचण आहे असं कळलं की अमर नाईकवाडेंचा फोन तयार असतो. मग कधी जिल्हा शल्यचिकित्सकांना विनंती केली जाते, कधी खाजगी डॉक्टरांना सांगितले जाते तर कधी कोव्हिड सेंटरमधील व्यवस्थेसंदर्भात ते धडपडत असतात. खर्‍या अर्थाने कोरोनाग्रस्तांना आधार देण्याचं काम एक अविरत सेवाव्रत म्हणून अमर नाईवाडेंनी सुरु केले आहे.

Advertisement

Advertisement