औरंगाबाद येथील एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून करणाऱ्या संशयित शरणसिंग सेठीला (२०) नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना शनिवारी घडली. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे.
मृत तरुणी ही 19 वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, शरणसिंग सेठी वर्षभरापासून तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता. सुखप्रीतसिंगसह तिच्या कुटुंबाने त्याची वारंवार समजूत घातली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्याने पाठलाग न करण्याचे आश्वासनही दिले. मात्र ते पाळले नाही. शनिवारी (21 मे) सुखप्रीतसिंग मैत्रिणीसह एका कॅफेत गेली. शरणसिंग तिच्यापाठोपाठ गेला व तिला बोलण्यासाठी हट्ट करू लागला. इतकेच नव्हे तर हाताला पकडून तिला कॅफेबाहेर आणले व मोकळ्या प्लॉटवर नेऊन धार्मिक शस्त्र कृपाणने तिच्या गळ्यावर एकापाठोपाठ 14, पोटात तीन वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास देवगिरी कॉलेजच्या मागील भागात ही थरारक घटना घडली. शरणसिंगच्या एकतर्फी प्रेमाच्या हट्टापायी दोन भावांची लाडकी बहीण असलेल्या निष्पाप सुखप्रीतसिंगचा मात्र बळी गेला.
शरणसिंग बेरोजगार
सुखप्रीतसिंगच्या मैत्रिणींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शरणसिंग आधीपासून महाविद्यालयात येऊन थांबला होता. तो तिची वाटच पाहत होता. कॉलेजच्या जिन्याजवळच त्याने सुखप्रीतसिंगला अडवले. ‘मला बोलायचं आहे, वर चल’ असा हट्ट त्याने सुरू केला. मात्र, सुखप्रीतसिंग वारंवार त्याला नकार देत होती. त्याचा राग आल्याने तो तेथेच तिच्या अंगावर धावूनदेखील गेला. मात्र, विद्यार्थी बरेच असल्याने तो तेथून मागे फिरला. मात्र, दीड वाजता पुन्हा गाठून अखेर त्याने तिची हत्या केली.