औरंगाबाद शहरात शनिवारी एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आली. शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती 'बीबीए'च्या प्रथम वर्षात शिकत होती. हल्लेखोराने तिला जवळपास 200 फूट ओढत नेऊन तिची चाकूने गळा चिरुन हत्या केली.
घटनेनंतर हल्लेखोर शरण सिंग पसार झाला असून, पोलिसांची 3 पथके त्याच्या मागावर आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळाचा परिसर नेहमीच विद्यार्थी व नागरिकांनी गजबजलेला असतो. पण, जीवाच्या भीतीमुळे कुणीही विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. तूर्त, या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
अशी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार , मृत विद्यार्थिनी व मारेकी दोघेही शहरातील उस्मानपुरा भागातील आहेत. ते एकमेकांना ओळखत होते. ते महाविद्यालय परिसरातील एक कॅफेत बसले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यानंतर मारेकऱ्याने आपल्याकडील शस्त्र काढून तिच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थिनी जीवाच्या आकांताने पळत सुटली. ती ओरडत असल्यामुळे तेथील लोक तिच्या दिशेने धावले. पण, तोपर्यंत हल्लेखोराने तिला गाठून तिला ठार केले.
दोनशे फूट नेले ओढत
खूनापूर्वी मारेकऱ्याने विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेले त्यानंतर तिचा गळा कापून खून केला. एकतर्फी प्रेमातून घडली घटना अशी माहिती मिळत आहे. मृत विद्यार्थीनी आणि मारेकरी एकाच समाजाचे आहेत. दोघेंही शहरातील उस्मानपूरा या परिसरात राहतात.
शहरात वाढल्या खूनाच्या घटना
शहरात गेली काही दिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. यातच काही दिवसांपूर्वी शहरात युवकाचा काही युवकांनी निर्घृण खून केला होता. 21 एप्रिल 2022 रोजी देखील औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आला होता. निर्दयी घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला होता. आज बरोबर एक महिन्यानंतर हत्येच्या दुसऱ्या घटनेने औरंगाबाद हादरले आहे. तर चार दिवसात 19 वर्षीय तरुणीची हत्या होण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे.
शहरातील नारेगावमध्ये एका 19 वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला. नारेगाव भागातील राजेंद्रनगरात बुधवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रेणुका देविदास ढेपे, असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीने आत्महत्या केली आहे.